सुळगा (हिं.) / वार्ताहर

उचगाव येथे बेळगाव तालुका विविध कार्यकारी संघाच्यावतीने ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, आदर्श शिक्षिका गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला. संघाचे संस्थापक चेअरमन अशोक पाटील हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

या कार्यक्रमाला एपीएमसीचे माजी अध्यक्ष युवराज कदम, मनोज पावशे, ग्रा. पं. सदस्य एल. डी. चौगुले, बंटी पावशे, मनोहर कदम, रमेश घुमटे, यल्लाप्पा चौगुले, सीमाँव फर्नांडिस, वाय. बी. चौगुले, किरण पावशे आदि उपस्थित होते.

प्रारंभी ग्रा. पं. अध्यक्ष मथुरा तेरसे व उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे यांनी सरस्वती प्रतिमेचे पूजन केले. तर प्रास्ताविक सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रकाश बेळगुंदकर यांनी केले.

याप्रसंगी ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष व आदर्श शिक्षिका वसुंधरा मोटराचे, बसुर्ते प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका ए. के. तारीहाळकर, उचगाव प्राथमिक शाळेच्या शिक्षिका संगीता शिंदे, त्याचबरोबर सुर नवा ध्यास नवा यामध्ये प्रवेश मिळवलेल्या हिंडलगा येथील सागर चंदगडकर व उचगांव हायस्कूल मधील १० वीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी मनोगत व्यक्त करताना ॲड. अनिल पावशे म्हणाले, मनात जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणा असेल तर कोणत्याही कामात यशाचे शिखर गाठता येते. मात्र यशस्वी होण्यासाठी आई-वडील व गुरुजनांचे आशीर्वाद आवश्यक असतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला व्हा. चेअरमन बसवंत बेनके, सर्व संचालक व सल्लागार उपस्थित होते. आभार व्यवस्थापक एन. वाय. चौगुले यांनी मानले.