• कारागृह उत्तर विभागाचे डीआयजीपी टी. पी. शेष यांना धमकीचा निनावी फोन  
  • तुरुंग अधिकाऱ्यांची चिंता वाढली  

बेळगाव / प्रतिनिधी 

कारागृह उत्तर विभागाचे डीआयजीपी टी. पी. शेष यांना आलेल्या धमकीच्या निनावी फोनमुळे खळबळ माजली आहे. धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीने बेळगाव येथील हिंडलगा कारागृहासह बेंगळूर कारागृह आणि टी. पी. शेष यांच्या बेंगळूर येथील निवासस्थानी बॉम्ब हल्ला करून हिंडलगा कारागृहात दंगल घडविण्याची धमकी दिल्याने तुरुंग अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. 

याबाबत हिंडलगा कारागृहाचे अधिक्षक जगदीश गस्ती म्हणाले,  फोन कॉलमध्ये त्याने अंडरवर्ल्ड गँगस्टर बन्नंजे राजा याच्या नावाचाही उल्लेख केला. बन्नंजे राजा तुरुंगात असताना त्याला मदत केल्याचे त्याने सांगितले.

या अज्ञात व्यक्तीकडून कारागृह प्रशासनाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कारागृह विभागाचे डीआयजीपी टी. पी. शेष यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून बॉम्ब धमकीच्या कॉलचा तपास सुरु आहे.