• मुस्लिम बांधवांकडून धार्मिक सलोख्याचे दर्शन

बेळगाव /  प्रतिनिधी 

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने नवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात येणारी दुर्गामाता दौड आज सातव्या दिवशी बेळगाव शहरातील कॅंटोन्मेंट परिसरात पार पडली. यावेळी दौडमध्ये परंपरेप्रमाणे धार्मिक सलोख्याचे दर्शन घडले. प्रारंभी काँग्रेस रोडवरील श्री शिवतीर्थावर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून दुर्गामाता दौडला प्रारंभ झाला. प्रमुख पाहुणे एस. के. पाठक यांच्याहस्ते ध्वज चढवून  प्रेरणामंत्र म्हणून दौडला सुरुवात करण्यात आली. 

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुस्लिम समाजाने कॅंटोन्मेंट परिसरात दुर्गामाता दौडचे स्वागत केले. यावेळी कॅन्टोन्मेंट  माजी उपाध्यक्ष साजिद शेख यांनी भगव्या ध्वजाला हार घालून पूजन केले. यानंतर दौडमध्ये सहभागी झालेल्या धारकऱ्यांना फळे, साखर, बिस्किटे व पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले. यातून कॅंटोन्मेंट परिसरातील मुस्लिम समाज धार्मिक सलोख्याचा आदर्श घालून दिला.

याप्रसंगी बोलताना साजिद शेख म्हणाले, दरवर्षी नवरात्रीला येथे मुस्लिम समाजाच्यावतीने दुर्गामाता दौडचे स्वागत करून धारकऱ्यांना अल्पोहाराचे वाटप करण्यात येते. दुर्गामाता दौड ही बेळगावची शान असल्याचे त्यांनी सांगितले. 

त्यानंतर ग्लोब टॉकीज रोड, इंडिपेंडंट रोड, चर्च स्ट्रीट, गवळी गल्ली, कोर्ट स्ट्रीट, कोंडाप्पा रोड, चर्च स्ट्रीट, मद्रास स्ट्रीट, फिश मार्केट रोड, तेलगू कॉलनी, कॅम्प येथील हनुमान मंदिर, खानापूर रोड, धर्मवीर संभाजी महाराज चौक मार्गे शंभू जत्तीमठ दुर्गामाता मंदिर येथे दौडची सांगता झाली. 

यावेळी विजयराव देशमुख लिखित "शककर्ते शिवराय" या पुस्तकाबद्दल छत्रपती सेवा प्रतिष्ठान, नागपूर येथील मंगेश बरबडे मनीष उधव, राम देशपांडे यांच्या वतीने माहिती देण्यात आली. त्यानंतर पूर्व विभाग प्रमुख प्रचारक हिरामणी मुचंडीकर यांचे गोहत्या तसेच दुर्गामाता दौड आपण का काढतो याविषयावर व्याख्यान झाले. त्यानंतर आरती करून ध्येय मंत्र म्हणण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे उद्योजक शिरीष गोगटे आणि उद्योजक मुकेश कामटे यांच्याहस्ते ध्वज उतरण्यात आला.यावेळी अंगावर पांढरे कपडे, डोक्यावर भगवे फेटे आणि टोप्या, हातात भगवे ध्वज घेऊन हजारो युवक - युवती दौडमध्ये सहभागी झाले होते.