- बेळगावात पोलीस शहीद दिन गांभीर्याने
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरातील जिल्हा पोलीस परेड मैदानावर शनिवारी पोलीस शहीद दिन साजरा करण्यात आला. यावेळी बेळगाव शहर पोलिस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा, जिल्हाधिकारी डॉ.नितेश पाटील, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, पोलिस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा आणि रोहन जगदीश आदि अधिकाऱ्यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली.
यानंतर बंदुकीने हवेत फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. तत्पूर्वी बेळगाव शहर पोलिस आयुक्त एस. एम. सिद्धरामप्पा यांनी शहीद पोलिस अधिकाऱ्यांची नावे जाहीर केली.
याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील म्हणाले, १९५९ मध्ये, भारताच्या सीमेला लागून असलेल्या जम्मू आणि काश्मीरमधील लडाख प्रदेशात चीनने हल्ला करून १८९ भारतीय पोलिसांची हत्या केली. भारतीय सीआरपीएफ कमांडंट करम सिंग यांच्या नेतृत्वाखालील सीआरपीएफ दलाच्या जवानांनी वीरमरण पत्करले. त्यांच्या स्मरणार्थ लडाखमध्ये पोलीस स्मारक बांधण्यात आले आहे. पोलीस शहीद दिन दरवर्षी २१ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. या लढाईत भारतातील १८९ आणि कर्नाटकातील १६ पोलीस शहीद झाले. पोलिसांच्या निष्ठेमुळेच समाजातील प्रत्येकाला शांतता आणि आरामदायी जीवन जगता येत आहे, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी शहर पोलिस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनीही मनोगत मांडताना शहीद पोलिसांना श्रद्धांजली वाहिली.
या कार्यक्रमास जि. पं. मुख्यकार्यकारी अधिकरी हर्षल भोयर, जिल्हा पोलिसप्रमुख भीमाशंकर गुळेद,पोलिस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा आणि रोहन जगदीश सेवानिवृत्त अधिकारी जयश्री माळगी आदि उपस्थित होते.
0 Comments