सुळगा (हिं.) / वार्ताहर

सुळगा (हिं.) ता. बेळगाव येथील ग्रामदैवत व जागृत देवस्थान असलेल्या ब्रह्मलिंग मंदिराचे गावातील युवकांच्या पुढाकारातून सुशोभिकरण करण्यात आले आहे.

सुशोभीकरणानंतर पूर्णपणे कायापालट झालेले हे मंदिर सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. मंदिराचे सुशोभीकरण पूर्ण झाल्याने  उद्या सोमवार दि. ११ सप्टेंबर रोजी या सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

गावातील सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने मंदिराभोवती सांडपाणी साचून दुर्गंधी निर्माण होत होती. मागील तीन वर्षांपासून ही समस्या होती. याबाबत आवाज उठवून विनंती करूनही दुर्लक्ष करण्यात आले होते. याची दखल घेत  गावातील युवकांनी एकत्र येत मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाचा निर्णय घेतला.

सांडपाण्याचा निचऱ्यासंबंधी ग्रामपंचायतीला सूचना केली. ग्रामपंचायतीने सांडपाण्याच्या निचऱ्याची तात्पुरती सोय केली. यानंतर युवकांनी पुढाकार घेऊन देवस्की पंच कमिटीला निवेदन देत मंदिर सुशोभीकरणाची परवानगी घेतली.

मंदिराला देणगी मिळविण्याकरिता सुळगा whatsapp ग्रुप  तयार करून मदतीचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला लक्षणीय प्रतिसाद लाभला. आत्तापर्यंत  सुमारे साडेतीन ते चार लाखा पर्यंत देणगी जमा झाली आहे. तसेच, अनेकांनी श्रमदान केले.  या सर्वांच्या अथक परिश्रमामुळे आज नवीन स्वरूपातील ब्रह्मलिंग मंदिर सर्वांसमोर उभे आहे.

-उद्या लोकार्पण सोहळा

उद्या सोमवार दि. ११ सप्टेंबर रोजी ब्रह्मलिंग मंदिर सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त पहाटे ५.३० वा. श्री महारुद्र अभिषेक व आरती होणार असून सकाळी १० वाजता लोकार्पण कार्यक्रम होणार आहे. दुपारी २ ते ४.३० सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. सायंकाळी ६ ते ७.३० वा विविध महिला भजनी मंडळाचा हरिपाठ कार्यक्रम होणार आहे.