• बंद घराचे कुलूप तोडून २५ तोळे दागिन्यासह ३ लाखाची रोकड लंपास
  • नागरिकांतून भीतीचे वातावरण

निपाणी / प्रतिनिधी 

निपाणी चिमगांवकर गल्लीतील बंद घराचे कुलूप तोडून भरदिवसा चोरट्यांनी घरातील तिजोरीत असलेले २५ तोळे सोने व ३ लाख रूपयांची रोख रक्कम असा अंदालजे १६ लाख रूपयांचा ऐवज लंपास केला. मंगळवार दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. सुमारास रफीक अहमदमजीद पट्टेकरी यांच्या घरी ही चोरीची घटना घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांतून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, चिमगांवकर गल्लीत रफिक पट्टेकरी हे आई, पत्नी, दोन मुले व एक मुलगी वास्तव्यास आहेत. मुलीचे नोव्हेंबरमध्ये लग्न ठरल्याने ते पत्नी व मुलीसह मुंबईला खरेदीला गेले होते. तर घरातील इतर सदस्य इचलकरजी येथील नातेवाईकांच्याकडे गेले होते. तर दोन मुले स्वतःच्या सायकल दुकानाकडे होती. 

हीच संधी साधून चोरट्यांनी घराशेजारी असलेल्या बोळातून येत मागील दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला, तसेच समोरील मुख्य दरवाजाला आतून कडी लावली. यानंतर आतील खोलीत दाराजवळ असलेली तिजोरी कटवणी, कटर व इतर साहित्याच्या सहाय्याने फोडली. तिजोरीतील ५ तोळ्याची बोरमाळ, ५ तोळ्याचा टिक्का, ५ तोळ्याचा हार आणि इतर १० तोळ्याचे दागिने आणि  ३ लाख रूपयांची रोख रक्कम घेवून पोबारा केला.

घरातून जाताना जिन्यावरून गच्चीवर जात पाठीमागील दारातूनन चोरटे पसार झाले. यावेळी घरात आणि बाहेर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये दिसणार नाही याची चोरटयांनी पुरेपूर काळजी घेतली. पण गच्चीवर गेल्याने समोरील सीसीटीव्हीत चोरट्याची छबी कैद झाली आहे. 

रात्री उशिरा सायकल दुकानातील मुले  घरी आल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. त्यानंतर  शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार मंडळ  पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार, उपनिरीक्षिका उमादेवी व सहकाऱ्यांनी नी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.याबाबात रफिकअहमंद पठट्टेकरी यांनी बुधवारी सकाळी पोलीसात फिर्याद दाखल केली आहे.

----

मध्यरात्री श्वान पथक दाखल

चोरीची माहिती दिल्यानंतर मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास बेळगाव येथील श्वानपथक दाखल झाले. तर दोन वाजता सुमारास गोकाक येथील ठसे तज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन ठसे घेतले आहेत.

-----

चोरीसाठी विविध साहित्याचा वापर

चोरीसाठी नवीन एक्सा ब्लेड, पक्कड, पाना, बॅटरी, कटर ब्लेड अशा विविध साधनांचा वापर करण्यात आला आहे. तिजोरी उचकटल्यानंतर हे सर्व साहित्य टाकून चोरट्यांनी पोबारा केला आहे.