• बेळगावात विश्वकर्मा समाज बांधवांचा मोर्चा 
  • जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर 

बेळगाव / प्रतिनिधी 

'२अ'  श्रेणीतून आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी  विश्वकर्मा समाजाच्या वतीने आज बेळगावात मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

चन्नम्मा सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रणरणत्या उन्हात काढलेल्या या मोर्चात शहरातील विश्वकर्मा समाजाचे ज्येष्ठ व्यक्ती महिला आदि सहभागी झाले होते.

मोर्चा दरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, विश्वकर्मा सेवा संघ खानापूरचे तालुकाध्यक्ष मारुती बडिगेर म्हणाले, आमचा समाज मागासलेला आहे. तेव्हा आम्हाला दोन श्रेणीतून आरक्षण मिळावे, अशी प्रमुख मागणी आम्ही सरकारकडे केली आहे. आमच्या पूर्वजांच्या जात प्रमाणपत्रावर हिंदू मराठा असा उल्लेख आहे. मात्र मुलांच्या जात प्रमाणपत्रावर विश्वकर्मा असे लिहिलेले आहे, आम्हाला सरकारी लाभ मिळत नाहीत, ते आम्हाला मिळावे अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी विश्वकर्मा संघाचे अध्यक्ष रमेश देसुरकर यांनी सर्वप्रथम प्रसारमाध्यमांचे आभार मानले. विश्वकर्मा समाजाचे शोषण होत आहे. आमच्या समाजातील मुलांना शिष्यवृत्ती मिळत नाही तसेच आम्हाला कोणत्याही शासकीय योजना मिळत नाहीत.आमच्या समाजाला आरक्षणाची नितांत गरज आहे. खानापूर, कारवार, निपाणी, संकेश्वर, चिक्कोडी येथे विश्वकर्मा समाज मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही गावापासून हे शहराच्या तालुका व जिल्हास्तरापर्यंत आंदोलने केली आहेत. आम्हाला आरक्षण मिळावे अशी  मागणी असल्याचे ते म्हणाले.

या मोर्चात शहरातील शेकडो विश्वकर्मा  समाजबांधव उपस्थित होते.