- बेळगाव महापालिकेतील महसूल विभागाच्या बैठकीवेळी घडला प्रकार
बेळगाव / प्रतिनिधी
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठकी दरम्यान घेतलेल्या झाडाझडतीमुळे उभ्या उभ्या चक्कर आल्याने आसनावर कोसळलेल्या एका अधिकाऱ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले.
बेळगाव महापालिका उपायुक्त रेश्मा तालीकोटी यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठकीवेळी आज बुधवारी सकाळी हा प्रकार घडला. मात्र बैठकीच्या ठिकाणी महसूल अधिकारीच चक्कर येऊन पडल्याची घटना सर्वांच्याच चर्चेचा विषय झाली आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार महापालिकेच्या महसूल विभागातील वसुली सद्यस्थिती, महसूल गोळा करण्यात होणारी दिरंगाई तसेच महसूलवाढी संदर्भात चर्चा करण्यासाठी आज बुधवारी सकाळी महापालिका उपायुक्त रेश्मा तालीकोटी यांच्या अध्यक्षतेखाली महसूल खात्याची बैठक बोलाविण्यात आली होती.
यावेळी महापालिका उपायुक्त रेश्मा तालीकोटी यांनी बैठकीस उपस्थित असलेले महसूल अधिकारी श्रीकांत इराले यांना धारेवर धरले. उपायुक्तांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना भांबावून गेलेल्या श्रीकांत इराले यांना चांगलाच घाम फुटला आणि काही वेळातच अचानक चक्कर आल्याने ते उभ्या उभ्या आसनावर कोसळले. रक्तदाब वाढल्याने त्यांची प्रकृती अचानक खालावली. यावेळी बैठकीला उपस्थित असलेल्या सर्वांची एकच धावपळ उडाली.
यानंतर महसूल अधिकारी श्रीकांत इराले यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
0 Comments