बेळगाव / प्रतिनिधी 

महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यानंतर बेळगावात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. येथील गणेशोत्सवाला ११९ वर्षांची वैभवशाली परंपरा आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात शहरातील कायदा - सुव्यवस्था अबाधित ठेवून शांतता राखण्यासाठी दोन टप्प्यात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती  शहर पोलिस आयुक्त एस. एन.सिद्धरामप्पा यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. यावेळी ते पुढे म्हणाले, शहर - उपनगरातील विविध गल्ल्यांमध्ये ३७८ सार्वजनिक गणेशमूर्तींची स्थापना करण्यात येते.  

परिणामी येत्या दि. १८ ते २७ या गणेशोत्सावाच्या कालावधीत बंदोबस्तासाठी  (२) पोलिस उपायुक्त , (४) सहाय्यक पोलिस आयुक्त, (२८) पोलिस निरीक्षक, (५०) पोलिस उपनिरीक्षक, (१५०) सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, (१५००) पोलिस कॉन्स्टेबल , (६००) होमगार्ड , कर्नाटक राज्य राखीव दलाच्या १० तुकड्या आणि कोईम्बतूरहून जलद कृती दलाचे पथक येणार आहे.

दि. २७ सप्टेंबरपासून सुरक्षा व्यवस्थेत आणखी वाढ करण्यात येणार असून, २७ सप्टेंबर ते विसर्जन संपेपर्यंत परजिल्ह्यातून (६) जिल्हापोलिसप्रमुख , (२०) उपजिल्हापोलिसप्रमुख, (८०) हून अधिक पोलिस उपनिरीक्षक, कर्नाटक राज्य राखीव दलाच्या १० तुकड्या आणि १००० हून अधिक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी येणार आहेत. 

मिरवणूक मार्ग, गणेशोत्सव मंडप, संवेदनशील भागात आम्ही ४५० सीसी कॅमेरा बसवत आहोत. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी प्रमुख ठिकाणी  कॅमेरे वापरण्यात येणार असल्याचे शहर पोलिस आयुक्त एस.एन.सिद्धरामप्पा यांनी स्पष्ट केले.