• विजयपूर शहराच्या नवबाग येथील घटना 

विजयपूर / वार्ताहर 

पत्नी व सासूची निर्घृण हत्या केल्यानंतर आरोपी व्यक्तीने स्वतः पोलिस स्थानकात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली. विजयपूर शहरातील नवबाग येथे गांधीचौक पोलिस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली. रुपा म्हेत्री (वय ३२) , कल्लव्वा (वय ५५) अशी मृतांची नावे आहेत. तर मल्लिकार्जुन म्हेत्री असे आरोपीचे नाव आहे. 

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, रुपा मुलांची नीट काळजी घेत नव्हती व  घरकामही करत नव्हती. तसेच महिला आणि विविध संस्थांच्या कामामुळे रूपा नेहमी जास्तीत जास्त वेळ घराबाहेर असायची, हा राग मनात धरून मल्लिकार्जुन याने पत्नी रूपा आणि सासू कल्लव्वा झोपलेल्या असताना त्यांच्या डोक्यात काठीने वार करून हत्या केल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे. 

घटनेची माहिती मिळताच गांधीचौक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी विजयपूरच्या सरकारी रुग्णालयात पाठविले. या घटनेची नोंद गांधीचौक स्थानकात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.