बेळगाव / प्रतिनिधी 

ऐन गणेशोत्सवात हुबळी शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. काल बुधवार दि. २० सप्टेंबर रोजी शहरातील बसवेश्वरनगर लक्ष्मी ले- आऊट येथील एका घरात रात्री उशिरा घडलेल्या चोरीच्या घटनेत चोरट्यांनी एक कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली.

याबाबत प्राप्त माहितीनुसार विद्या मंदिर बुक डेपोचे मालक उल्हास दोड्डमणी यांच्या घरात ही चोरीची घटना घडली. चोरट्यांनी घराच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला. तसेच घरातील व्यक्तींचे हातपाय बांधून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच गोकुळ रोड, पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करून पंचनामा केला.

या घटनेची नोंद गोकुळ रोड पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहे. हुबळीतील ईदगाह मैदानावर गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून त्या ठिकाणी अधिक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात गस्त घालण्यासाठी पोलिसांची कमतरता आहे. हीच संधी साधून चोरट्यांच्या टोळीने घरफोडी केल्याची चर्चा नागरिकांतून सुरू आहे.