• कक्केरीत शेतकऱ्यांचे रास्तारोको आंदोलन 
  • हजारो शेतकऱ्यांचा सहभाग 
  • खानापूर - हल्याळ महामार्गावर चक्काजाम 

खानापूर / प्रतिनिधी 

पावसाने दडी मारल्याने यावर्षी  खानापूर तालुक्यात भात पिकासह पावसाळी पिके देखील यंदा नष्ट होत चालली आहेत, असे असताना कर्नाटक सरकारने खानापूर तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश न करता तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला आहे. खानापूर तालुका हा उत्तर कर्नाटकाला जीवनदायी देणारा असला तरी यावर्षी तालुक्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे भात पिके पूर्णतः सुकून गेली आहेत. शिवाय पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता खानापूर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी  खानापूर तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश करण्यात यावा तसेच बेळगाव -पणजी राष्ट्रीय महामार्गात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या मोबदल्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करावी. या मागणीसाठी कक्केरी - लिंगनमठ भागातील रयत संघटनेच्या शेकडो शेतकऱ्यांनी कक्केरीत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

शुक्रवारी सकाळी ९ वा पासूनच यल्लाप्पा चन्नापूर यांच्यासह शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सुरुवात झाली.आंदोलनाला दोन तास उलटल्यानंतर सुद्धा कोणीही अधिकारी भेटीसाठी न आल्याने शेतकरी आक्रमक झाले आणि जोपर्यंत प्रांताधिकारी येऊन आम्हाला ठोस आश्वासन देत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नाही असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतल्यामुळे हे आंदोलन अधिकच तीव्र झाले असून रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे खानापूर - हल्याळ महामार्ग ठप्प झाला आहे.

पंधरा दिवापूर्वी राष्ट्रीय रयत  संघटनेच्या वतीने खानापूर तहसीलदार कार्यालयावर, हलगी मोर्चा काढून लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्यात अन्यथा कक्केरी येते रास्तारोको आंदोलन जोडण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला होता. त्याला अनुसरूनच आज हे रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले आहे.