• सकाळी घरगुती तर सायंकाळी सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना 
  • बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र उत्साहाचे वातावरण
  • पारंपारिक वाद्यांचा गजर

(फोटो सौजन्य : सौ. आर. आर. पाटील)

बेळगाव / प्रतिनिधी

"गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा" जयघोष , पारंपरिक वाद्यांचा गजर अन् फटाक्यांच्या अतिषबाजीत बेळगाव शहरासह तालुक्यात विघ्नहर्त्या गणरायाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. मंगलमय वातावरणात सकाळी घरगुती तर सायंकाळी सार्वजनिक श्री गणेश मूर्तींची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. 

तत्पूर्वी सकाळपासूनच तालुक्यासह शहर - परिसरात नागरिकांची गणेशमूर्ती आणण्यासाठी लगबग दिसून आली. 





परिणामी शहरातील समादेवी गल्ली, खडेबाजार, बापट गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, टिळकवाडी, शहापूर-वडगांव यासह शहराच्या विविध भागात गणेशमूर्ती नेण्यासाठी आलेल्या भाविकांमुळे रस्ते गर्दीने फुलून गेले होते. 





बाप्पाच्या पूजेसाठी लागणारी पाच फळे आणि पूजा साहित्याचीही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुले - हार आणि फळांचे दर वाढल्याचे दिसून आले. 

- रिमझिम पावसाच्या सरींमध्येही गणेशभक्तांचा उत्साह


अधिकमांसामुळे लांबलेल्या गणेशोत्सवाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. मात्र गेल्या दीड महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने जणू बाप्पाच्या आगमनापूर्वी गेल्या चार दिवसांपासून मुहूर्त साधला आहे. आज सकाळीही अधूनमधून पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. दुपारपर्यंत हा ऊन - पावसाचा खेळ सुरु होता. पण गणेश भक्तांच्या उत्साहावर याचा कोणताच परिणाम झाला नाही.

सर्वांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे भक्तिमय वातावरणात जल्लोषी स्वागत केले. यानंतर घरगुती गणेशाची प्रतिष्ठापना आणि शास्त्रोक्त पुजा-अर्चा केल्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून सर्वांनी बाप्पाच्या साक्षीने स्नेहभोजन केले. 

- सार्वजनिक गणेश मूर्तींचे आगमन अन् प्रतिष्ठापना -   

सायंकाळी तीन नंतर शहर व ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि गणेश मूर्ती येण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉली व इतर वाहनांचा वापर केला. रात्री उशिरापर्यंत मंडळाच्या गणेश मूर्ती नेल्या जात होत्या. त्यानंतर मूर्ती प्रतिष्ठापना व आरती करण्यात आली. भाविकांची होणारे गर्दी लक्षात घेऊन शहर ग्रामीण व पोलीस स्थानकातर्फे सर्वत्र पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्री उशिरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेश मूर्तींचे मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना केली.

- बेळगाव तालुका आणि शहरातील घरगुती गणेश मूर्तींची निवडक छायाचित्रे