• ९ चोरट्यांना अटक :  ७.८९ लाखांचे सोन्याचे दागिने , रोख रक्कम, वाहने जप्त 
  • जिल्हा पोलिसप्रमुख भीमाशंकर गुळेद यांची माहिती 


बेळगाव / प्रतिनिधी 

जिल्हाअंतर्गत विविध ठिकाणी चोऱ्या - घरफोड्या, वाहन व जनावरांच्या चोरी प्रकरणी ९ अट्टल चोरट्यांना अटक करण्यात गोकाक पोलिसांना यश आले. अटक करण्यात आलेल्या चोरट्यांकडून सोन्याचे दागिने,  रोख रक्कम व वाहने असा एकूण ७.८९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा पोलिस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी दिली.

मंगळवारी बेळगाव घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले, गोकाक तालुक्याच्या कनसगेरी गावातील गुरुनाथ बडिगेर, हे दि. १४ सप्टेंबर रोजी गोकाक येथून कनसगेरी येथे जात असताना दरोडेखोरांनी त्यांची दुचाकी अडून त्यांचे सोन्याचे दागिने लुटले होते. याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीच्या आधारे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी  बेळगावचे अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख वेणुगोपाल व गोकाकचे डीएसपी दादापीर मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली गोकाकचे पोलीस निरीक्षक गोपाळ राठोड यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करून तपास हाती घेण्यात आला. या पथकात गोकाकचे पोलीस निरीक्षक गोपाळ राठोड, उपनिरीक्षक किरण मोहिते, एमडी घोरी, अंकलगीचे उपनिरीक्षक एचडी येरझरवी यांच्यासह सहकारी व्ही.आर.नायक, डी.जी.कोन्नूर, एस. व्ही. कस्तुरी, एस.एच. इरगार, एम.बी. गेडगिरी, एम. एम. हल्लोळी, जी. एच. गुडले, एम. बी. तळवार आदींचा सहभाग होता. 

तपास दरम्यान सोमवार दि. १८ सप्टेंबर २०२३ रोजी बेनचनमर्डी कुख्यात खिलारी गॅंग आणि गोकाक एस. पी. सरकारमधील ९ चोरट्यांना अटक करून ताब्यात घेण्यात आले. सदर चोरट्यांनी गोकाक शहर व लगतच्या गावांमध्ये तसेच संकेश्वर, यमकनमर्डी, अंकलगी, चिक्कोडी, उपरट्टी आधी ठिकाणी दरोडा, खंडणी, वाहन चोरी , गुरे चोरी, हनी ट्रॅप आदि गुन्हे केल्याची कबुली दिली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, ९ मोबाईल संच ,७ दुचाकी , गुन्ह्यासाठी वापरलेली दोन चार चाकी वाहने , ४ जांबी - तलवार असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींवर दरोडा - खंडणी , गुरे, दुचाकी चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या प्रकरणाचा यशस्वी छडा लावणाऱ्या पोलीस पथकाचे जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी कौतुक केले आहे.