- मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची माहिती
- जिल्हाधिकारी कार्यालयात मलप्रभा प्रकल्प सिंचन सल्लागार समितीची बैठक
बेळगाव / प्रतिनिधी
मलप्रभा - अचुकट्टू परिसरात येत्या शुक्रवार दि. २२ सप्टेंबर पासून पंधरवड्यासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर निर्णय सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.
आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मलप्रभा प्रकल्प सिंचन सल्लागार समिती बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून त्या बोलत होत्या. सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची तरतूद या दोन्ही बाबी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सल्लागार समितीच्या निर्णयाच्या आधारे अधिकारी आदेश जारी करतील. मलप्रभा अचुकट्टू परिसरातून शुक्रवारपासून पंधरवड्यापर्यंत पाणी उपसा करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री हेब्बाळकर यांनी दिली.
या बैठकीत आमदार एन. एच. कोनारेड्डी म्हणाले, पावसाळी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याचा साठा करून गरजेनुसार पिण्याचे पाणी सोडावे, अशी सूचना त्यांनी केली. तसेच दुष्काळ जाहीर केल्यामुळे परिस्थितीच्या आधारे टप्प्याटप्प्याने पिण्यासाठी पाणी सोडता येईल असेही मत त्यांनी व्यक्त केले.
सौंदतीचे आमदार विश्वास वैद्य म्हणाले, जनता आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची गरज असून मलप्रभा जलाशयातून पाणी सोडावे अशी विनंती त्यांनी केली.
यावेळी विधान परिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे अत्यावश्यक आहे त्यामुळे आवश्यकतेनुसार पाणी सोडावे अशी सूचना केली. तर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी, पुढील जून महिन्यापर्यंतचा हिशेब लक्षात घेऊन जलाशयातील पाणी व्यवस्थापन करावे लागेल त्यामुळे सल्लागार समितीने हा मुद्दा लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, असे मत व्यक्त केले.
या बैठकीला मुख्य अभियंता अशोक वासनाड, मलप्रभा पाटबंधारे सल्लागार समितीचे सदस्य, सचिव तथा अधीक्षक अभियंता व्ही.एस. मधुकर, जलनिर्मल संघाचे अध्यक्ष सद्गौडा पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ.भीमाशंकर गुळेद व पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
0 Comments