- विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका
- कोसळण्यापूर्वी इमारत पाडविण्याची ग्रामस्थांची मागणी
खानापूर / प्रतिनिधी
ढोकेगाळी (ता. खानापूर) येथील सरकारी प्राथमिक शाळेची शाळेची इमारत सध्या धोकादायक स्थितीत असून कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या अवस्थेत आहे. परिणामी विद्यार्थी व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर आणि शिक्षणाधिकारी राजश्री कुडची यांनी याकडे लक्ष देऊन ही इमारत कोसळण्यापूर्वी पाडविण्याची व्यवस्था करावी अशी नागरिकांची मागणी आहे.
सदर इमारत अंदाजे दहा - बारा वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती. परंतु बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याने एका बाजूच्या भिंती संपूर्ण कोसळल्या आहेत. दररोज इमारतीचा थोडा थोडा भाग कोसळत आहे. आठ दिवसापूर्वी त्याठिकाणी खेळत असलेल्या विद्यार्थिनीच्या बाजूला सदर शाळेचा थोडा भाग कोसळला, दैव बलवत्तर म्हणून सदर विद्यार्थिनी थोडक्यात बचावली. या शाळेत पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग भरवले जातात. सद्यस्थितीत शाळेला कार्यालय व एक खोली अशा दोनच खोल्या आहेत. त्यामुळे कार्यालयातच दोन वर्ग भरवले जातात. व तीन वर्ग दुसऱ्या खोलीत भरवले जातात, यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण बनले आहे. याबाबत वरिष्ठांशी चर्चा केली असता, शाळेला अनुदान मंजूर झाले असून लवकरच बांधकाम करण्यात येणार असल्याचे सांगितले. परंतु बांधकामाला अद्यापही सुरुवात करण्यात आलेली नाही.
याकरिता खानापूरचे आमदार विठ्ठलराव हलगेकर व खानापूरच्या शिक्षणाधिकारी राजश्री कुडची यांनी याकडे लक्ष्य देऊन पडण्याच्या स्थितीत असलेली शाळेची धोकादायक इमारत पाडविण्याची विनंती ढोकेगाळी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच अनुदान प्राप्त झाल्यानंतर शाळेची इमारत लवकरात लवकर बांधून विद्यार्थ्यांची अडचण दूर करण्याचीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
0 Comments