•  खानापूर तालुक्यातील नायकोल क्रॉसनजीक घटना 

 खानापूर / प्रतिनिधी 

आयशर टेम्पोने रस्त्यानजीक उभ्या असलेल्या दहा चाकी कंटेनरला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात आयशर टेम्पोमधील एक ठार चौघे जखमी झाले. खानापूर तालुक्यातील नायकोल क्रॉसनजीक आज रविवार दि. १७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ही घटना घडली. नारायण लक्ष्मण कडोलकर (वय ६५) असे अपघातातील मृताचे नाव आहे. तर वैभवी विठ्ठल मनोळकर (वय ४१) व  अझीत फिलीप लिमा (वय ४५) दोघीही (रा. संगरगाळी) व  फिलिप बस्ताव लिमा (वय ६०) व विठ्ठल शांताराम मनोळकर (वय ४९) दोघेही (रा. संगरगाळी) हे गंभीर जखमी झाले. चार जखमी पैकी तिघांवर खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून, पुढील उपचारासाठी बेळगावला पाठविण्यात आले. तर एका किरकोळ जखमीवर‌ खानापुरात उपचार करण्यात आले. 

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, माडीगुंजीहून खानापूरकडे येत असलेल्या आयशर टेम्पोने  नायकोल क्रॉसजवळ  रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या दहा चाकी कंटेनरला पाठीमागच्या बाजूने धडक दिली. यावेळी आयशरमध्ये डाव्या बाजूला बसलेले नागरिक नारायण लक्ष्मण कडोलकर (वय ६५)  हे पाय तुटल्याने  ट्रकमध्येच बराच वेळ अडकून पडले. परिणामी अतिरक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. 

अपघाताची माहिती मिळताच माजी आमदार अरविंद पाटील तातडीने खानापूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल झाले. आणि  स्वतः तेथे थांबून जखमींवर त्वरित  उपचार करण्यास सांगितले. तसेच  नारायण कडोलकर यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात अपयश आले. यावेळी त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या मयत नारायण कडोलकर यांच्या मुलाला धीर दिला. त्याचप्रमाणे  पोलिसांना ताबडतोब पंचनामा करण्यास सांगून व डॉक्टरांनाही तातडीने उत्तरीय  करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास सांगितले.

अपघातग्रस्त आयशर संगरगाळी गावातून खानापूरला कोंडा भरण्यासाठी येत होता अशी माहिती प्राप्त झाली आहे. ऐन गणेश उत्सवाच्या काळात ही दुर्दैवी  घटना घडल्याने संगरगाळी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.