- सजावटीच्या साहित्यासह विविध वस्तूंनी फुलली बाजारपेठ
- व्यापारातून मोठी उलाढाल : विक्रेत्यांमधून समाधान
बेळगाव / प्रतिनिधी
येत्या दि. १९ सप्टेंबर रोजी लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. भक्तगण बाप्पाच्या स्वागतासाठी आतुर झालेले आहेत. गणेशोत्सव अवघ्या एका दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वत्र लगबग सुरू झाली आहे.
महाराष्ट्रानंतर बेळगाव मध्ये मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. सार्वजनिकरित्या आणि घरगुती गणेश प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात होत असते आणि श्री गजाननाची अकरा दिवस मनोभावे पूजा केली जाते.अगदी बाप्पाचे आगमन होईपर्यंत खरेदी आणि तयारी पूर्ण होत नाही.
प्रत्येकाला आपल्या गणपती बाप्पासाठी मखर सजावट सर्वात उत्कृष्ट असावी, विविध रंगांच्या फुलांनी आरास आणि नवनवीन देखाव्यांनी अत्यंत सुंदर सजावट असावी अशी मनोकामना असते. गणेशोत्सवासाठी बेळगाव बाजारपेठ फुलली असून शहरातील गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडे बाजार, पांगुळ गल्ली आदि गल्ल्यामध्ये मध्ये विविध वस्तूंचे स्टॉल्स आकर्षक रित्या लावण्यात आले आहेत.
प्रवीण भातकांडे, व्यापारी |
यंदा गणेशोत्सव सर्वांनी मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचा विचार केलेलाआहे. त्यामुळे कुर्ता, पॅन्ट आणि डेकोरेशन साहित्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. तसेच मखरासाठी ही मागणी जास्त आहे. त्यामुळे आम्ही येथे कुर्ता - पॅन्ट, लाइटिंगचे सामान, मखर विक्रीसाठी ठेवलेले आहे. अशी प्रतिक्रिया व्यापारी प्रवीण भातकांडे यांनी दिली आहे.
गणरायाला घरी विराजमान करण्यासाठी दरवर्षी एक आगळीवेगळ्या पद्धतीने मखर निर्माण करणाऱ्यांसाठी यंदा पर्वणीच आहे. बाजारपेठेत पर्यावरण पूरक मखर विक्रीसाठी दाखल झाले आहेत.
थर्माकॉलचे मखर हे नाजूक असतात, त्यासाठी यंदा फायबर आणि फोमशीटमध्ये नवीन मखर रफ अँड टफ उपलब्ध झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, पंढरपूरचा विठोबा, राजमहल देखावा, राज दरबार, सिंहासन अशा नानाविध प्रकारामध्ये मखर दाखल झाले आहेत.
सचिन भातकांडे, कलाकार |
बाजारपेठेत खरेदीसाठी दिवसेंदिवस गर्दी वाढत असून बाप्पांच्या स्वागतासाठी बेळगावकरांची जय्यत तयारी सुरू आहे.
0 Comments