• अटक केलेले दोघे संशयित कोल्हापूरचे  

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव शहरातील शिवबसवनगर येथे एका युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. या खून प्रकरणाचा यशस्वी तपास करून  माळमारुती पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या दोन दिवसात दोघा संशयितांना गजाआड केले आहे. प्रथमेश धर्मेंद्र कसबेकर (वय २०, रा. राजारामपुरी गायछाप गल्ली कोल्हापूर) व आकाश कडप्पा पवार (वय २१, रा. राजाराम चौक) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील अजून एक आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

या घटनेबाबत सविस्तर हकिकत अशी की, गेल्या दोन दिवसांपूर्वी दि. ३० ऑगस्ट रोजी शिवबसवनगर बेळगाव येथे रात्रीच्या वेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांपैकी एकाने रस्त्यावरून चालत निघालेल्या नागराज इरप्पा गाडीवड्डर या युवकाचा दगडाने ठेचून खून केला होता. याप्रकरणी माळमारुती पोलीस स्थानकात अज्ञातांविरुद्ध  खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.

या घटनेच्या तपासाकरिता पोलिस उपायुक्त शेखर यांनी एक विशेष पथक तयार केले होते. या पथकाने दोन दिवसातच या प्रकरणाचा यशस्वी तपास केला आहे.

खुनाचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून प्रेम प्रकरणातून खून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सदर खून प्रकरणाचा अल्पावधीत तपास केलेल्या माळ मारुती पोलिसांचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक करून त्यांना बक्षीस जाहीर केले आहे.

सदर प्रकरणातील अन्य एका आरोपीसह खऱ्या सूत्रधाराला अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.