- आमदारांनी घेतला कडक निर्णय
- नगरपंचायत कर्मचारी आंदोलनाचा झाला शेवट
खानापूर / प्रतिनिधी
खानापूर नगरपंचायतीसमोर शुक्रवारी धरणे आंदोलन करणाऱ्या नगरपंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची आमदार विठ्ठल हलगेकर यांनी भेट घेतली. यानंतर नगरपंचायतीच्या कर्मचारी व नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेत तहसीलदार प्रकाश गायकवाड त्यांना तिथे बोलावून घेतले. तसेच तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून मुख्याधिकाऱ्यांची बदली करण्यास सांगितले. मात्र यावेळी तिथे उपस्थित असलेल्या मुख्याधिकाऱ्यांनी मी स्वतःच इथून जात असल्याचे लिहून देतो मला मोकळीक द्या असे स्पष्ट केले. यावर तहसीलदारांनी त्यांना त्या आशयाचे लेखी पत्र देण्यास सांगितले व त्यांच्या जागी प्रभारी मुख्याधिकारी म्हणून, नगरपंचायतीच्या राजश्री वेरणीकर यांच्याकडे तात्पुरता कार्यभार सोपविण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय कर्मचाऱ्यांचा थकीत असलेला पगार सुद्धा देण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहे.
यावेळी भाजप युवा नेते पंडित ओगले, भाजप तालुका अध्यक्ष संजय कुबल, राजेंद्र रायका आणि कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांची बरीच खरडपट्टी काढली.
तत्पूर्वी सकाळपासूनच नगरपंचायतीसमोर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मुख्याधिकारी आर. के. वटारी यांच्या मनमानी विरोधात नगरपंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी नगरपंचायतीसमोर धरणे आंदोलन केले. तसेच या ठिकाणी नवीन मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी केली. या आंदोलनाला अनेक नगरसेवक सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दिला होता .
खानापूर नगरपंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा पगार मुख्याधिकारी राजू वटारी यांनी दिला नसल्याने, कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. काही कामगारांचा दोन दोन महिन्यांचा, काही कामगारांचा तीन महिन्यांचा तर काही जणांचा चार महिन्यांचा पगार देण्यात आला नाही. त्यामुळे शेवटी कंटाळलेल्या कर्मचाऱ्यांनी नगरपंचायतीचे प्रभारी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांची भेट घेतली आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली असता, तहसीलदारांनी मुख्याधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली व कर्मचाऱ्यांचे पगार देण्यास सांगितले.
- मुख्याधिकाऱ्यांची कामगारांवर अरेरावी -
आंदोलन झाल्यानंतर काही वेळाने कामगार नगरपंचायतीत आले असता, तुम्ही तहसीलदारांकडे का गेलात. तहसीलदार तुमचा पगार काढणार का? मीच तुमचा पगार काढणार. पण आता तहसीलदारांकडूनच पगार घ्या अशा शब्दात कामगारांशी वाद घातला. व प्लास्टिक खुर्ची घेऊन कामगारांना मारण्यासाठी धावला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष शहानुर गुडलाल यांच्या अंगावर धावून जात त्यांना खुर्चीने मारण्याचा प्रयत्न केला.
0 Comments