• गोवा बनावटीचा बेकायदा मद्यसाठा जप्त : एकास अटक 

बेळगाव / प्रतिनिधी  

प्लायवूडच्या फळ्यांनी भरलेल्या टेंम्पोमधून चोरट्या पद्धतीने होणारी मद्यवाहतूक रोखून गोवा बनावटीचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला. राष्ट्रीय महामार्गावर सुवर्ण विधानसौधपासून पुढे बेळगाव अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून ही कारवाई केली. गोव्यातून अन्यठिकाणी पाठविण्यासाठी सदर मद्यसाठ्याची वाहतूक करण्यात येत होती. याप्रकरणी टेंम्पोचालक (वीरेंद्र कल्पनानाथ मिश्रा , वय ३४ रा. वाराणसी उत्तरप्रदेश) यास ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून वाहतुकीसाठी वापरलेले वाहन आणि बेकायदा मद्यसाठा असा एकूण ५३ लाख ८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अबकारी अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे. सदर आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 


याबाबत प्राप्त माहितीनुसार, गोव्याहून एका टेंम्पोमधून मोठ्या प्रमाणात  बेकायदा मद्य साठ्याची वाहतूक करण्यात येत असल्याची ,माहिती मिळताच बेळगाव अबकारी खात्याचे अधीक्षक विजयकुमार आणि उपाधीक्षक मुरगोड यांच्या मार्गदर्शनाखाली अबकारी खात्याच्या पथकाने सापळा रचला. शुक्रवारी रात्री  ३.३०  वाजण्याच्या सुमारास शहर बाहेरील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर बेळगाव सुवर्ण विधानसौधच्या पुढे काही अंतरावर अबकारी पथकाने सदर टेंम्पो अडवून ही मोठी कारवाई केली .

त्यानंतर अबकारी अधिकाऱ्यांनी टेंम्पो चालकाची चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. तेंव्हा संशय आल्याने सदर टेंम्पो  बेळगाव अबकारी विभागाच्या आवारात आणण्यात आला .त्यानंतर आज शनिवारी सकाळी प्रसार माध्यमांसमोर या टेंम्पोची तपासणी करण्यात आली. त्यावेळी टेंम्पोमध्ये भरलेल्या प्लायवूडच्या मोठ्या फळ्यांच्या आतल्या बाजूला प्लायवूड कापून निर्माण केलेल्या दोन मोठ्या कप्प्यांमध्ये महागड्या उंची दारूच्या बाटल्यांचा साठा आढळून आला. बाहेरून कोणालाही कल्पना येणार नाही अशा पद्धतीने दारूच्या बाटल्यांचे बॉक्स प्लायवूडच्या फळ्यांमध्ये लपविण्यात आले होते.

जप्त करण्यात आलेल्या या लाखो रुपयांच्या दारूच्या साठ्यामध्ये ब्लेंडर स्प्राईड, सिग्नेचर वगैरे विविध प्रकारच्या महागड्या उंची दारूच्या बाटल्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे बियरच्या बाटल्या देखील सापडल्या आहेत. अबकारी खात्याचे संयुक्त आयुक्त मंजुनाथ यांनी अबकारी विभागाच्या आवारात माध्यमांना ह्या कारवाईची माहिती दिली. गोव्यातून परराज्यात मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे किनारपट्टीकडून येणाऱ्या सर्व वाहनांवर आम्ही पाळत ठेवली. संशयित वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये मद्यसाठा आढळून आला. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील चालक वीरेंद्र याने गोव्यातून अवैधरित्या दारूची वाहतूक केल्याची कबुली दिली आहे. मात्र, ते कुठे नेत होते, हे त्याने सांगितले नाही. 

या कारवाईत उत्पादन शुल्क बेळगाव विभागाचे सहआयुक्त फेरोज खान किल्लेदार, विजय कुमार हिरेमठ, उत्पादन शुल्क अधिक्षक रवी यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव दक्षिण विभागाच्या उत्पादन शुल्क उपायुक्त वनजाक्षी एम. , मुरगोड उत्पादन शुल्क अधिक्षक यांच्यासह बेळगाव उपविभाग उत्पादन शुल्क निरीक्षक रवींद्र होसळळी , उत्पादन शुल्क उपनिरीक्षक एस.एच.सिंगाडी , कर्मचारी बी.एस.अटगल , महादेव कटीगन्नावार , चालक सय्यद जलानी आदींचा सहभाग होता.