• ३४ हजार रुद्राक्षांची पर्यावरण पूरक गणेशमूर्ती लक्षवेधी 
  • मूर्तिकार सुनील आनंदाचे यांची किमया 

बेळगाव / प्रतिनिधी

प्रदूषण, जंगलतोड आदींमुळे तासात चाललेल्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकरिता बेळगाव येथील मंडळे सज्ज झाली आहेत. जुन्या गांधीनगरचे शिल्पकार सुनील सिद्धाप्पा आनंदाचे यांनी यंदा ३४ हजार रुद्राक्षातून १२ फूट उंच गणेश मूर्ती बनवली आहे.

बेळगावातील गणेशोत्सवाला एक अनोखी परंपरा आहे. १९०५ मध्ये लोकमान्य टिळकांनी बेळगावात सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली. तेव्हापासून बेळगावात सातत्याने विविध सामाजिक व पर्यावरण पूरक उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा केला जातो. ही परंपरा पुढे सुरू ठेवत आजच्या आधुनिक काळातही अनेक मंडळांनी पर्यावरण पूरक गणेश मूर्ती साकारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मूर्तिकारही त्यात उत्साहाने हातभार लावत आहेत. बेळगावच्या जुन्या गांधीनगर येथील मूर्तिकार सुनील सिद्धाप्पा आनंदाचे हे गेल्या काही वर्षांपासून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती तयार करण्याचा छंद जोपासत आहेत. त्यांनी यापूर्वी काजू, सुकामेवा, कागद, फुले, धान्य आणि बारीक वाळू पासून मूर्ती बनवली होती. हीच परंपरा कायम ठेवा यंदाही त्यांनी ३४ हजार  रुद्राक्षांपासून बनविलेले बारा फूट उंचीची भव्य गणेश मूर्ती साकारली आहे.

याबाबत मूर्तिकार सुनील आनंदाचे प्रसार माध्यमांना माहिती देताना म्हणाले, मी केवळ पर्यावरण वस्तूंपासून गणेश मूर्ती बनवितो यापूर्वी कोविड काळात मोदक ड्रायफ्रूट्स,पेपर,ग्लास, फुले,धान्य आणि वाळू पासून गणेश मूर्ती बनवल्या होत्या. यावर्षी रुद्राक्षातून १२ फूट उंचीची भव्य गणेश मूर्ती बनवण्याचा मला आनंद आहे. व्यवसायाने प्लंबर असल्याने  रोज दीड तास काम करत होतो. कागद आणि पुठ्ठ्यातून आकार तयार करून त्यावर रुद्राक्ष जोडले आणि मूर्ती तयार करण्यासाठी दीड ते दोन महिने लागले. मला या कामात मित्र-मैत्रिणी आणि शेजारच्या महिलांनी मदत केली त्यामुळे ही मूर्ती मी स्वतः बनवली असे म्हणू शकत नाही असे त्यांनी स्पष्ट केले. सदर मूर्ती नानावाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी बनविण्यात आली होती. येत्या शनिवारी किंवा रविवारी मंडळाचे गणेश मूर्तीची घेऊन जातील असे त्यांनी सांगितले.