• ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण 

खानापूर / प्रतिनिधी 

देवपूजेसाठी घराच्यापाठीमागील बाजूला असलेल्या चिकूबागेतून फुले आणण्यासाठी गेलेल्या महिलेला पाहून केळीच्या झाडात बसलेल्या दोन अस्वलानी अचानक उडी मारून पलायन केले.आज सोमवार दि. २१ ऑगस्ट रोजी, सकाळी ६ वाजता गंगवाळी (ता. खानापूर) गावात ही घटना घडली. त्यामुळे गंगवाळी व आजूबाजूच्या गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, गंगवाळी गावातील नागरिक ग्रामपंचायत सदस्य शंकर कुरुमंकर यांच्या मातोश्री रामाक्का या पूजेसाठी लागणारी फुले आणण्यासाठी घराच्या पाठीमागे असलेल्या चिकूच्या बागेत गेल्या. केळीच्या झाडांच्या बाजूला असलेल्या फुलांच्या झाडाची फुले काढत असताना, त्या ठिकाणी झाडीत बसलेल्या दोन अस्वले त्यांना पाहून, अचानक उडी मारून पळून गेली. परंतु अस्वलाना पाहून रामाक्का घाबरल्या व आपल्या घराकडे पळत सुटल्या. या गडबडीत त्यांना ठेच लागली व त्या खाली पडल्या. त्यांच्या ओरडण्याने शेजारी असलेल्या नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्यांनी रामाक्काना उठवून बसविले व धीर दिला. 

यावेळी त्याठिकाणी उपस्थित नागरिकांनीही दोन्ही अस्वले गावाला लागूनच असलेल्या जंगलाकडे वेगवेगळ्या दिशेने पळत गेल्याचे पाहिले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन अस्वलांचा बंदोबस्त करावा अन्यथा काही अनर्थ घडल्यास त्याला वनविभाग जबाबदार राहील,असा इशारा गंगवाळी गावच्या ग्रामस्थांनी वनविभागाला  दिला आहे.