• रायबाग तालुक्याच्या कुडची गावातील घटना 

रायबाग / वार्ताहर 

कुडची (ता. रायबाग ; जि. बेळगाव) येथील पोलीस स्थानकाच्या हद्दीत गडदेनजीक कृष्णा नदीत पडून एका तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य दोघेजण बचावले. हुसेन अरकट्टे (रा. गांधीनगर,बेळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार अरकट्टे कुटुंबिय रविवारी कुडची येथील दर्ग्याच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून घरी परतण्यापूर्वी हुसेनसह अन्य दोघेजण कृष्णा नदीच्या काठावर बसले होते. यावेळी हुसेनचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडला. पाण्यात पडताना सुटकेसाठी त्याने स्वतः सोबत असलेल्या इतर दोघांचाही हात धरला. त्यामुळे तिघेही पाण्यात बुडाले. दरम्यान घटनेची माहिती समजतात घटनास्थळी धाव घेऊन दोघांना वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. मात्र हुसेन नदीच्या खोलपात्रात पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेल्याने हाती लागला नाही.


घटनास्थळी अद्यापही मच्छीमार आणि अग्निशामक दलाकडून हुसेनला शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या घटनेची नोंद कुडची पोलीस स्थानकात झाली आहे.