सुळगा (हिं.) / वार्ताहर 

बेळगाव तालुक्यासह शहरात सोमवारी नागपंचमी सण परंपरेप्रमाणे भक्तिभावाने साजरा करण्यात आला. नाग सापाला शेतकऱ्यांचा मित्र मानले जाते. शेतातील पीक फस्त करणाऱ्या उंदरांना साप आपले भक्ष्य बनवतो. त्यामुळे पिकांचे संरक्षण होते. म्हणून सापांंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करतात. 

नागपंचमीनिमित्त आज घरोघरी नागदेवतेच्या मूर्तींचे विधिवत पूजन करण्यात आले. लाह्या, दूध, तंबिट, पातोळ्या आणि अळूभाताचा नैवेद्य दाखविण्यात आला.

तालुका तसेच शहराच्या विविध भागात नागपंचमीच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. काही गावात कालच नागाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली.

नागपंचमीनिमित्त शिवलिंगाला अभिषेक करून ओम नमः शिवाय मंत्र पठण करताना काका - पुतण्याची अनोखी जोडी...



तर काही गावात आज नागपंचमी दिवशी सकाळी नागाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना व पूजन करण्यात आले. सायंकाळी उशिरा प्रथेप्रमाणे अळू - भाताचा नैवेद्य दाखवून विसर्जन करण्यात आले.