• १४ लाखांचा मुद्देमाल लंपास 
  • गोंधळी गल्लीतील घटनेनंतर शहरात खळबळ  

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बंद घराचे कुलूप तोडून झालेल्या धाडसी घरफोडीमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेत चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारला आहे. हा चोरीचा प्रकार गोंधळी गल्ली येथील चेतन कुरणे यांच्या घरी घडला आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, कुरणे कुटुंबिय काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. यावेळी घर बंद असल्याचे  निदर्शनास आल्याने संधी साधून चोरट्यांनी शुक्रवारी रात्री १२ नंतर परिसरातील वर्दळ शांत होताच  घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि २४ तोळे सोन्याचे दागिने आणि १ लाख ३० हजार रुपये असा सुमारे १४ रु. ऐवज लांबविला.

दरम्यान कुरणे कुटुंबिय आज शनिवारी सकाळी बेळगावला परतले असता, घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर लागलीच खडेबाजार पोलीस स्थानकाशी संपर्क साधून त्यांनी चोरीची तक्रार दाखल केली.

घटनेची माहिती मिळताच खडेबाजार पोलिस स्थानकाचे निरीक्षक दिलीप निंबाळकर यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

घटनास्थळी ठसेतज्ञ आणि श्वान पथकाच्या मदतीने चोरट्यांना शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र श्वान गोंधळी गल्ली, गवळी गल्ली परिसरातून माघारी फिरले. या घटनेची नोंद खडेबाजार पोलिस स्थानकात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.