• पर्यटकांसाठी सुरक्षात्मक उपाययोजना राबविण्याकरिता केली पाहणी  

गोकाक / वार्ताहर 

सार्वजनिक बांधकाम तथा बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी आज गोकाक फॉल्सला भेट देऊन पाहणी केली. बेळगाव जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या गोकाक फॉल्सला सरासरी ३ ते ४ लाख पर्यटक भेट देतात.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना करण्याकरिता गोकाक धबधब्याला भेट दिल्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, प्रसिद्ध गोकाक फॉल्सच्या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. तेव्हा धबधब्याच्या विकासासाठी करावयाच्या कामांची त्यांनी पर्यटन विभागाकडून माहिती घेतली असून लवकरच गोकाक फॉल्स विकसित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांच्या समवेत युवा नेत्या प्रियंका व युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्यासह स्थानिक नेते व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.