• बेळगाव महापालिका सार्वजनिक बांधकाम व नगररचना स्थायी समितीची बैठक 


बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव शहरातील सर्व रस्त्यांची गणेशोत्सवापूर्वी डागडुजी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम व नगररचना स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. नुकतीच स्थायी समिती सभापती वाणी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत ही बैठक पार पडली. 

समृद्ध संस्कृतीमुळे बेळगावच्या गणेशोत्सवाला ऐतिहासिक परंपरा आहे. यावेळी नजीकच्या राज्यातून अनेक भाविक सार्वजनिक गणेश दर्शनासाठी येतात, मात्र मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी रस्ता निसरडा झाला आहे. त्यामुळे रस्त्यांच्या डागडुजीसाठी आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना अध्यक्षांनी बैठकीत दिल्या.

त्याबाबत निविदा मागवून पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.शहरातील बंद असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या १२ युनिटच्या दुरुस्तीसाठी पावले उचलण्यात आली. मात्र या निर्णयाला काही सदस्यांनी आक्षेप घेतला. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या या युनिट्सची दुरुस्ती महापालिकेने का करावी? त्याची दुरुस्ती स्मार्ट सिटीनेच करावी, असे म्हणणे सदस्यांनी मांडले. 

या बैठकीत अध्यक्षांच्या संमतीनुसार राज्योत्सव व इतर राष्ट्रीय सण साजरे करण्यासाठी १ कोटी ७५ लाख रुपये खर्च करण्यासह , ४९ कर्मचाऱ्यांच्या  नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला. 

निधारनगरमधील अंतर्गत नाल्यांच्या दुरुस्तीसाठी कंत्राटी तत्त्वावर ४९ कामगारांच्या नियुक्ती याबाबत या बैठकीत चर्चा होऊन या कामासाठी कोणते अनुदान वापरले जात आहे, अशी विचारणा सदस्यांनी केली.यावेळी या कामांच्या देखभाल दुरुस्तीसाठी पालिकेकडून १.५ कोटी रुपयांचे अनुदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच शहरातील गटारींच्या दुरुस्तीचे काम महापालिकेच्या आरोग्य विभागाला देण्यात आले होते. त्याऐवजी कंत्राटी कामगारांना कामावर घेण्याचा प्रस्ताव असल्याचे उपायुक्त (प्रशासन) भाग्यश्री हुग्गी यांनी सांगितले.शहरातील रस्त्याच्या मधोमध बांधकाम साहित्य टाकले जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्याचे अभियंत्यांनी बैठकीत सांगितले. 

या बैठकीला मंगेश पवार, संतोष पेडणेकर, रूपा चिक्कलदिन्नी, जरीना फतेह खान, शकीला मुल्ला, लक्ष्मी निपाणीकर आदि उपस्थित होते.