• बेळगाव शहरात विहिंप - बजरंग दलाची निदर्शने
  • राष्ट्रपतींच्या नावे जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर 

बेळगाव / प्रतिनिधी

हरियाणातील नुह आणि अन्य ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून समाजकंटकांकडून हल्ले आणि हिंसाचाराच्या घटना घडवून आणल्या जात आहेत. याच्या निषेधार्थ आज देशभरासह बेळगाव शहरातही विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने देशव्यापी आंदोलन छेडण्यात आले. यावेळी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करून हरियाणातील हिंसाचारातील समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. आंदोलन दरम्यान विहिंप आणि बजरंग दल कार्यकर्त्यांनी जय श्रीरामसह हरियाणा समाजकंटकांना शिक्षा झालीच पाहिजे, समाजकंटकांचा नि:पात केलाच पाहिजे अशा जोरदार घोषणा दिल्या. यानंतर राष्ट्रपतींच्या नावे जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभरातील दहशतवाद नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत असताना, भारतात अशा हिंसाचाराच्या घटना घडवून आणणे हे अतिशय दुर्दैवी आहे. बजरंग दलातर्फे गेल्या कित्येक वर्षांपासून मेवाड व धार्मिक ठिकाणी दरवर्षी यात्रा आयोजित केली जाते. पण यात्रा सुरळीत होऊ न देण्याच्या उद्देशातून समाजकंटकांकडून नियोजनबद्धरित्या हल्ले घडवून आणत निष्पापांना त्रास देण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे सरकारने ठोस पावले उचलून या समाजकंटकांचा बिमोड केला पाहिजे,अशी मागणी आंदोलन करणाऱ्या विहिंपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. यावेळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.