- जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर
बेळगाव / प्रतिनिधी
शेतीसाठी दिवसा नियमित सात तास वीजपुरवठा करावा , बेळगाव तालुक्यातील अगसगे गावात ११० केव्ही वीज वितरण केंद्र सुरु करावे, आदी मागण्यांसाठी कर्नाटक राज्य रयत संघ बेळगाव तालुका शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
बेळगाव तालुक्यातील काकती गावात ११० केव्ही वीज वितरण केंद्र असले तरी तेथून अगसगे व परिसरातील घरे आणि शेतीला सुरळीत वीज पुरवठा होत नाही अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. त्यामुळे अगसगे गावातच असे केंद्र सुरु करावे, शेतीच्या सिंचनासाठी रात्री तीन तास वीज पुरवण्याऐवजी दिवसा वीज पुरवावी या मागण्यांसाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना रयत संघाचे नेते कलगौडा बाळगौडा पाटील म्हणाले, अगसगे परिसरातील गावांना सुरळीत वीज पुरवठा केला जात नाही. त्यामुळे अनेक समस्या उदभवत आहेत. त्या निवारण्यासाठी अगसगे गावातच ११० केव्ही वीज वितरण केंद्र सुरु करावे अशी आमची मागणी आहे. त्यासाठी गावकरी आवश्यक जागा देण्यास तयार आहेत. याशिवाय अगसगे परिसरातील शेतीला सिंचनासाठी रात्री तीन तास वीजपुरवठा केला जातो. मात्र तोही खंडीत स्वरूपाचा असतो. त्यामुळे दिवसा नियमित सात तास वीज पुरवावी अशी मागणी त्यांनी केली.यावेळी रयत संघाच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. याप्रसंगी वैजू हालेनावर, वैजू लमाणी यांच्यासह अगसगे, कडोली परिसरातील शेतकरी, रयत संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments