• घडविले माणुसकीचे दर्शन !

म्हैसूर / वार्ताहर 

दुचाकी आणि ऑटोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोन तरुणांच्या मदतीला धावून जात महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी माणुसकीचे दर्शन घडविले.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, गृहलक्ष्मी योजना उद्घाटन समारंभाच्या पार्श्वभूमीवर चामराजनगर येथील प्राथमिक बैठक आटोपून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर मंड्या शहराकडे जात असताना, शहराबाहेरील मुख्य रस्त्यावर दोड्डापेठ क्रॉसनजीक दुचाकीवरून जात असलेल्या दोन तरुणांना ऑटोची धडक बसली आणि ते  जागीच खाली कोसळले. या दरम्यान त्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपली गाडी थांबवून जखमींची विचारपूस केली. तसेच रुग्णवाहिकेला पाचरण करून स्थानिकांच्या मदतीने अधिक उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले. कामाचा ताण असतानाही मंत्री हेब्बाळकर यांनी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी सर्व व्यवस्था केली. दोड्डापेठ क्रॉस येथे वारंवार होणाऱ्या  अपघातावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी विनंती यावेळी स्थानिकांनी केली. जखमींना मदत करून मंत्री हेब्बाळकर यांनी घडविलेल्या माणुसकीचे स्थानिकांमधून कौतुक होत आहे.