• मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची माहिती 

चामराजनगर / वार्ताहर 

कर्नाटकात सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनांची काँग्रेस सरकार पूर्तता करत आहे. जनतेला सांगितल्याप्रमाणे सरकारने १०० दिवसांच्या आत हमी योजना लागू केल्या आहेत ,असे महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. म्हैसूर येथे ३० ऑगस्ट रोजी होणाऱ्या गृहलक्ष्मी योजनेच्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर चामराजनगर येथे आयोजित प्राथमिक बैठकीत त्या बोलत होत्या. 

म्हैसूर येथे ३० ऑगस्ट रोजी अभिनेते डॉ.राजकुमार नाट्यगृहाच्या प्रांगणात जिल्हा प्रशासनाच्या इमारतीत, एकाच वेळी राज्यात १३ हजार ठिकाणी योजनेचा कार्यारंभ करणार असल्याचे मंत्री हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले. 

मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार चांगले काम करत आहे. आमच्या विभागात खूप काम आहे. गृहलक्ष्मी योजनेचा शुभारंभ झाल्यानंतर विभागाच्या कामाला गती येईल, असे मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बुधवारी होणाऱ्या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. यासाठी अंगणवाडी व आशा सेविकांनी मोठी भूमिका बजावावी, असे सांगून मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या,  चामराजनगरमध्ये सर्वाधिक महिलांनी गृहलक्ष्मी योजनेसाठी नोंदणी केली असून, त्यासाठी अंगणवाडी सेविकांचे प्रयत्न पुरेसे आहेत. 

या बैठकीला चामराजनगरचे आमदार पुत्तरंगशेट्टी, गुंडलपेठचे आमदार गणेश प्रसाद, जिल्हाधिकारी शिल्पा नाग यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.