अथणी / वार्ताहर 

कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याहस्ते कोकटनूर (ता. अथणी, जि. बेळगाव) येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण व विविध विकास कामांचे उद्घाटन व पायाभरणी असा संयुक्त कार्यक्रम आज पार पडला.

उद्घाटनानंतर बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, कर्नाटक राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या पाच हमी योजनांच्या माध्यमातून शेतकरी, गरीब महिला, कामगार आणि मागासवर्गीय घटकातील प्रत्येक कुटुंबाला पाच हजार रुपये उपलब्ध होत आहेत.  त्यामुळे चांगल्या आर्थिक घडामोडी सुरू होतील त्यामुळे राज्याचा जीडीपी वाढेल, असा विश्वास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला.

यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या पुढे म्हणाले, शक्ती योजनेअंतर्गत आतापर्यंत ३५ कोटी महिलांनी बस मधून मोफत प्रवास केला आहे. त्यामुळे सरकारच्या महसुलात वाढ होईल, गृहलक्ष्मी योजना ही देशातील एक दुर्मिळ योजना आहे, जी राज्यातील १.३० कोटींहून अधिक कुटुंबांना दरमहा २००० रुपये देते. यासाठी दरवर्षी ३५,००० कोटी रुपयांची तरतूद केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

हमीभावाच्या अंमलबजावणीसह सरकारच्या कामगिरीने विरोधकांना धक्का बसला आहे. निवडणुकीदरम्यान दिलेले प्रत्येक आश्वासन सरकार पूर्ण करेल, असेही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार, महिला व बालकल्याण, विशेष दिव्यांग आणि जेष्ठ नागरिक सक्षमीकरण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांच्यासह विविध मंत्री आणि आमदार, काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.