बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव शहरातील सर्व मालमत्ता एका क्लिकवर समजावी याकरिता नगरविकास खात्यामार्फत गेल्या काही दिवसांपासून शहरातील मालमत्तांची माहिती ऑनलाईन करण्याचे काम सुरू आहे. मात्र या मालमत्ता माहिती बिल कलेक्टर्सच्या लॉगीनमध्ये अपलोड करण्याच्या कामात दिरंगाई झाल्यामुळे महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी महसूल विभागातील तब्बल ५५ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे.

त्यानंतर महापालिकेच्या महसूल विभागातील शहरातील डाटा जमा केला असून त्याचे संगणकीकरण  झाले आहे. पण बिल कलेक्टरच्या लॉगीनमध्ये तो अद्याप अपलोड करण्यात आलेला नाही. याबाबत वारंवार सूचना करूनही  चार बिल कलेक्टर्स वगळता इतरांनी १५ टक्क्यांपेक्षा कमी काम केले आहे. त्यामुळे या विषयावर आयुक्तांनी बैठक घेऊन विविध सूचना केल्या.  त्यानंतर महसूल निरीक्षक आणि बिल कलेक्टर्स मिळून ५५ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी दिलेले काम वेळेत पूर्ण केले पाहिजे. अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा आयुक्त दुडगुंटी यांनी दिला आहे. त्यामुळे त्यांच्या कारणे दाखवा नोटीसी नंतर काय कारवाई होणार याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे.

कामाचा ताण असून एकाचवेळी अनेक कामे करावी लागतात, त्यामुळे मालमत्ता माहिती बिल कलेक्टरच्या लॉगिन मध्ये अपलोड करता आली नाही, असे महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

शहरातील खुल्या जागांचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल देण्याबाबत आदेश देण्यात आले होते.  त्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे. पण या पथकाने कोणताही अहवाल दिलेला नाही. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याचे आढळून आले असून, शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये अशी नोटीस आयुक्त दुडगुंटी यांनी महसूल अधिकाऱ्यांना बजावली आहे.