• खून करणाऱ्या दोघांना अटक 
  • बापावर खुनाचा गुन्हा दाखल 

बेळगाव / प्रतिनिधी

दारूच्या नशेत कुटुंबीयांना त्रास देणाऱ्या मुलाचा वडिलांनी सुपारी देऊन काटा काढल्याची घटना मुरगोड पोलीस स्थानकाच्या हद्दीत उघडकीस आली आहे. पाच दिवसांपूर्वी झालेल्या या खून प्रकरणी मुरगोड पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे. संगमेश मारुतेप्पा तिगडी (वय ३८, रा. शिवानंदनगर बैलहोंगल) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

दि. २० ऑगस्ट रोजी कुटरनट्टी डोंगरावर दगडाने ठेचून संगमेशचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी मंजुनाथ होंगल, आडवेश बोळतीन (दोघेही रा. हिरेकोप्प, के. एम. ता. सौंदत्ती) या दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी संगमेशचे वडील मारुतेप्पा यांच्यावर एक कुणाचा गुन्हा दाखल झाला आहे मात्र त्यांना अद्याप अटक झाली नाही.

मुरगोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संगमेश हा नशेत येऊन कुटुंबीयांना त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून त्याच्या वडिलांनीच दोघा जणांना त्याला मारण्याची सुपारी दिली. अंकलगी येथे दारूपाजून दुचाकीवरून कुटरनट्टी डोंगरावर नेऊन त्याचा खून करण्यात आला आहे.