•  आज दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता 

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव तालुक्यातील शेतकरी आणि जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदासाठी येत्या दि. २७ ऑगस्ट रोजी होणार असलेल्या निवडणुकीतील तिढा अद्यापही कायम आहे.

या निवडणुकीसाठी एकूण अर्ज दाखल केलेल्या ५५ उमेदवारांपैकी १४ जणांनी सोमवारी अंतिम दिवशी अर्ज मागे घेतल्याने ४१ जण रिंगणात आहेत.

मंगळवारी रात्रीपर्यंत या निवडणुकीबाबतचे चित्र स्पष्ट होणार होते. मात्र अजूनही तिढा कायम असल्याने आज दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

पण सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या या कारखान्यात निवडणूक होऊ नये यासाठी काही जणांनी परस्पर संमतीने माघार घ्यावी आणि निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी  प्रयत्न सुरू आहेत. 

याबाबत प्राप्त माहितीनुसार विद्यमान अध्यक्ष अविनाश पोतदार आणि उपाध्यक्ष तानाजी पाटील यांना एकाच गटात ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले. पण दोघेही वेगवेगळ्या गटात गेले आहेत. त्यामुळे सत्ताधारी गटातील दिग्गज  वेगवेगळ्या पॅनल मधून निवडणूक लढविण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कोणते संचालक कोणत्या पॅनलमध्ये असणार याबाबतची उत्सुकता वाढली आहे.

रविवार २७ ऑगस्ट रोजी मतदान प्रक्रिया झाल्यानंतर त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीत सुमारे तीन हजार सभासद सहभागी होणार आहेत. त्यामुळे आज दुपारपर्यंत बिनविरोध निवडी बाबत कोणताही निर्णय न झाल्यास ही निवडणूक अत्यंत चुरशीशी होणार आहे.