• मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन 

 पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमीनिमित्तसुळगा (हिं.)
येथील ब्रह्मलिंग मंदिरात केलेली आकर्षक सजावट

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव  तालुक्यासह  शहरात आज पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी सण भक्तीभावाने साजरा करण्यात आला. श्रावणी सोमवार आणि नागपंचमी असा दुहेरी योग आल्याने सकाळपासूनच  तालुक्याच्या ग्रामीण भागातील सुळगा (हिं.) येथील ब्रह्मलिंग मंदिर, हिंडलगा व कल्लेहोळ येथील कलमेश्वर मंदिर, बेकिनकेरे येथील नागनाथ मंदिर यासह तालुक्याच्या विविध गावातील शिवमंदिरामध्ये रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी महादेवाचे दर्शन घेतले. 

त्याचप्रमाणे शहरातील महादेव आर्केड येथील शिवमंदिर, शंभू जत्तीमठातील शिवमंदीर, मिलिटरी महादेव मंदिर, गणेशपूर पाईपलाईन रोडवरील शिवगिरी मंदिर, याशिवाय शिवमंदीरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.


विशेषत: दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात श्रावण सोमवार आणि नागपंचमीनिमित्त नागदेवतेला दूध अर्पण करून भगवान भोलेनाथाचे दर्शन घेण्यासाठी रविवारी मध्यरात्रीपासूनच भाविक दाखल झाले होते. 

पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त कपिलेश्वर मंदिरात मध्यरात्रीपासूनच अभिषेक, रुद्राभिषेक, त्रिकाल पूजा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अभिषेकासाठी नाव नोंदणी केलेल्या भाविकांनी शिवलिंगाला जल आणि दुग्धाभिषेक केला. बेलाची पाने, दूध, फुले, हार, श्रीफळ, कापूर, उदबत्ती, प्रसाद, पूजेचे साहित्य घेऊन भाविकांनी देवाच्या दर्शनासाठी रांगा लावल्याचे पाहायला मिळाले.  


दरवर्षी होणारी गर्दी टाळण्यासाठी कपिलेश्वर मंदिर समितीने विशेष नियोजन केले असून रांगेतील भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी मंदिर समितीचे पदाधिकारी व शंभराहून अधिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. याशिवाय प्रत्येक गेटवर खासगी सुरक्षा संस्थांचे रक्षक तैनात आहेत. ७० वर्षांवरील वृद्ध भाविकआणि गर्भवती महिलांना प्रथम दर्शन घेण्याची परवानगी होती. एकंदरीतच योग्य नियोजनामुळे भाविकांना अल्पावधीतच दर्शन घेण्याची संधी उपलब्ध झाली.

मंदिर समितीचे पदाधिकारी राकेश कलघटगी यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देताना भाविकांना श्रावण सोमवार व नागपंचमी सणाच्या शुभेच्छा दिल्या.कोणताही गोंधळ न होता दर्शन प्रक्रिया सुरळीत पार पडल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, कपिलेश्वर मंदिरात भाविकांना सुरळीत दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आल्याने भाविकांनी आनंद व्यक्त केला. ताशिलदार गल्लीतील महिला भक्त वैशाली मोहन चौगुले यांनी मंदिर समितीने दर्शनासाठी उत्तम व्यवस्था  केल्याचे सांगितले. आम्ही दर श्रावण सोमवारी या मंदिरात येतो.हिंदू धर्मात श्रावण हा सर्वात पवित्र महिना मानला जातो. चातुर्मासात भगवान विष्णू निद्रावस्थेतत असतात असे मानले जाते.  तर भगवान शिव, श्री गणेश आणि इतर देव सृष्टीवर लक्ष ठेवतात. त्यामुळे हा महिना पवित्र मानला जातो असे त्यांनी सांगितले. 

तर राजेंद्र नामक आणखी एका भाविकाने सांगितले की, आम्ही दर सोमवारी कपिलेश्वर मंदिरात पूजेसाठी येतो. तसेच बेळगाव शहर व जिल्ह्याच्या विविध भागातून भाविकांचे आगमन होत असते. मंदिर समितीने अनेक सुधारणा केल्या आहेत. श्रावण सोमवारी दर्शनासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी स्त्री-पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र रांगांचे नियोजन करण्यात आले असल्याचे ते म्हणाले. 

एकंदरीत आज पहिला श्रावण सोमवार व नागपंचमीनिमित्त शहरासह तालुक्यातील शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची वर्दळ होती. सर्वांनीच भगवान भोलेनाथाने सर्व भक्तांचे कष्ट दूर करावेत अशी मनोभावे प्रार्थना केली.