- ८,२५,००० रु. किंमतीच्या २३ दुचाकी जप्त
बेळगाव / प्रतिनिधी
दोन आंतरराज्य चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून ८,२५,००० रु. किंमतीच्या २३ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. गोकाकचे पोलिस निरीक्षक गोपाळ आर. राठोड यांच्यासह बेळगावचे अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख एम. वेणूगोपाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली आहे.
या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती अशी की, गोकाक, अंकलगीसह नजीकच्या परिसरात गावातील घरासमोर व रस्त्यानजीक उभ्या केलेल्या अनेक दुचाकी चोरीस गेल्याच्या घटना अलीकडच्या काळात घडल्या होत्या. याप्रकरणी अंकलगी, गोकाक शहर व गोकाक ग्रामीणमध्ये दुचाकी चोरीच्या अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे दुचाकी चोरी प्रकरणाचा छडा लावून आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक तयार करून तपास करण्यात आला असता, दि. २४ ऑगस्ट रोजी दोन आंतरराज्य दुचाकी चोरट्यांना अटक करण्यात यश आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एकूण ८,२५,००० लाख रु. किंमतीच्या २३ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सदर दुचाकी महाराष्ट्रातील कोल्हापूर, करवीर, इचलकरंजी, हातकणंगले आणि बेळगाव जिल्ह्यातील गोकाक, निपाणी, हुक्केरी आणि संकेश्वर या भागातून चोरीस गेल्या होत्या.चौकशी दरम्यान आरोपींनी चोरीची कबुली दिली आहे.
गोकाकचे पोलिस निरीक्षक गोपाळ आर. राठोड यांच्यासह बेळगावचे अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख एम. वेणूगोपाळ यांच्या नेतृत्वाखाली आणि गोकाकचे डीएसपी डी. एच. मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखालील पथकात अंकलगी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक एच. डी. येरझरवी, गोकाक शहर पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक एम.डी.घोरी यांच्यासह गोकाक ग्रामीण पोलीस स्थानकाचे कर्मचारी किरण मोहिते, बी.व्ही.जवळे, विठ्ठल नायक, डी.जी. कोन्नूर, एस. व्ही. कस्तुरी एस. बी. यल्लाप्पागौडर, पी. के. हेब्बाळ, एम. एम. हल्लोळी, ए. आर. मलगी आदींचा सहभाग होता.
चोरीचा यशस्वी तपास केलेल्या पोलिस पथकाच्या कामगिरीची जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी प्रशंसा केली आहे.याशिवाय घरासमोर किंवा रस्त्याकडेला दुचाकी पार्क करताना व्यवस्थित लॉक कराव्यात तसेच सार्वजनिक ठिकाणी शक्यतो सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत दुचाकी पार्क करण्यात याव्यात असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.
0 Comments