- बेळगाव जिल्हापालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे उद्गगार
- जिल्हा प्रशासनातर्फे ७७ वा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात
बेळगाव / प्रतिनिधी
'स्वातंत्र्य' म्हणजे 'स्वाभिमान' आणि ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांचे बलिदान देऊन देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त केले, त्यांचे बलिदान सदैव स्मरणात ठेवा, असे उद्गगार सार्वजनिक बांधकाम तथा बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी काढले. बेळगाव शहरातील जिल्हा क्रीडांगणावर संपन्न झालेल्या ७७ व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी मंत्री जारकीहोळी यांनी आपल्या भाषणातून बेळगाव शहरासह जिल्ह्यातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील, शहर पोलिस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा , जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. संजीव पाटील , जि. पं. कार्यकरी अधिकारी हर्षल भोयर आदि उपस्थित होते.
प्रारंभी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच राष्ट्रगीताची धून वाजवून तिरंग्याला अभिवादन करण्यात आले. मंत्री सतीश जारकीहोळी यांनी परेडची पाहणी केल्यानंतर पोलीस बँडच्या तालावर पथसंचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली.
जिल्हा पोलीस सशस्त्र दल (डीएआर) ची तुकडी पथसंचलनाच्या अग्रभागी होती. कर्नाटक राज्य राखीव पोलीस दल (केएसआरपी), केएसआरपी महिला तुकडी, शहर जिल्हा महिला पोलीस, नागरी पोलीस, डीएआर जिल्हा तुकडी, गृहरक्षक दल, जिल्हा अबकारी पोलीस, वनखाते,अग्निशामक दल, एनसीसी मुले-मुली, भारत सेवा दल मुलींची तुकडी, अगसगे हायस्कूल, अल्पसंख्यांक मोरारजी देसाई शाळा रामतीर्थनगर, महिला विद्यालय हायस्कूल, भरतेश हायस्कूल, प्रेशियस ब्लोझम स्कूल, बेसन इंग्लिश मीडियम स्कूल यमनापूर, मराठा मंडळ इंग्लिश मीडियम हायस्कूल, सेंट मेरीज हायस्कूल, माहेश्वरी अंध मुलांची शाळा अशा विविध शाळांच्या तुकड्यांचा पथसंचलनामध्ये सहभाग होता.
यावेळी मंत्री सतीश जारकीहोळी पुढे म्हणाले, आज देश स्वतंत्र होऊन ७६ वर्षे झाली आहेत.महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीयांनी अहिंसक संघर्षातून मिळवलेल्या स्वातंत्र्याने जगाच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय सुरू केला आहे. स्वातंत्र्यलढ्यात आपल्या बेळगाव जिल्ह्याची भूमिका महत्त्वाची आहे. अतुलनीय लढवय्ये, सच्चे देशभक्त आणि स्वाभिमानी सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानामुळे बेळगाव जिल्हा स्वातंत्र्यलढ्यात अग्रेसर होता हे सर्वांना माहीत आहे. वीर कित्तूर राणी चन्नम्माने वाजवलेला स्वातंत्र्याचा बिगुल सर्वत्र वणव्यासारखा पसरला. स्वातंत्र्यलढ्यात सामील होणारी पहिली महिला होण्याचा मान मिळविलेल्या राणी चन्नम्मा ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीसाठी दुःस्वप्न ठरल्या.त्याच कित्तूर राज्यात लष्करी कमांडर असलेले क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा हे एक अतुलनीय देशभक्त होते ज्यांना फाशी देण्यात आली होती. इंग्रजांच्या बंदुकांना न घाबरता मातृभूमीचे स्वातंत्र्यसाठी त्यांनी प्राणाचे बलिदान दिले. क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास त्यांचा जन्म जन्म १५ ऑगस्टला झाला आणि २६ जानेवारीला त्यांनी वीर मरण पत्करले स्वातंत्र्यलढ्यात आघाडीवर असलेले आणखी एक गृहस्थ गंगाधर देशपांडे होते. ‘कर्नाटकचा सिंह’ आणि ‘कर्नाटकचा खादी भगीरथ’ अशी ओळख असलेल्या देशपांडे यांचे योगदान मोठे होते. त्यामळे फक्त स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनचं नव्हे तर स्वातंत्र्यलढ्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभागी झालेल्या अनेक व्यक्तींचे सदैव स्मरण केले पाहिजे असे ते म्हणाले.
मा. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवत आहे. जनतेला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शक्ती, अन्नभाग्य, गृहज्योती, गृहलक्ष्मी आणि युवानिधी अशा पाच हमी योजना राबविण्यात येत आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त बेळगाव शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासह पाच हमी योजनांची अंमलबजावणी सुरळीत होईल.वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी बेळगावच्या परिसरात अंदाजे 300 कोटी रुपये खर्चून नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत बांधायची आहे अशी माहिती त्यांनी दिली. स्वातंत्र्यदिन सोहळयास सरकारी आणि पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह स्थानिक आमदार, खासदार आणि बहुसंख्य देशप्रेमी नागरिक उपस्थित होते.
0 Comments