- सदलगा पोलिसांची कारवाई
सदलगा / वार्ताहर
घरमालकासह पत्नीचे हातपाय बांधून घरफोडी केल्याप्रकरणी आंतरराज्य चोरट्यांना अटक करण्यात सदलगा पोलिसांना यश आले. सदाशिव गुंडू पाटील (वय ५५, रा. सातारा, महाराष्ट्र), दीपककुमार जवाहर यादव (वय २३ रा. बिहार), मारुती बंदलकोप्प (वय २३, रा. सदाशिवनगर बेळगाव), तुकाराम पाटील (वय २२, रा. गडहिंग्लज, महाराष्ट्र) अशी अटक करण्यात आलेल्या चार आंतरराज्य चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र, गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी, सोन्याची कर्णफुले, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या घटनेबाबत हकीकत अशी की, सदर चारही चोरट्यांनी बेडकीहाळ (ता. निपाणी) येथील बाबा मोरे यांच्या घरी चोरी केली. तत्पूर्वी त्यांनी बाबा मोरे आणि त्यांच्या पत्नीचे हातपाय दोरीने बांधून त्यांना जबर मारहाण केली आणि ७५ ग्रॅम सोने, अडीच ग्रॅम सोन्याची कर्णफुले, सुवर्ण हार, मंगळसूत्र, दोन हजार रुपयांची रोख रक्कम मोबाईल असा ऐवज लंपास करून पोबारा केला होता.
याप्रकरणी बाबा मोरे यांनी सदलगा पोलीस स्थानकात चोरीची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे कारवाई करून सदलगा पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. या प्रकरणातील अन्य एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
बेळगाव जिल्हा व चिकोडी उपविभागाचे डीएसपी, पोलिस निरीक्षक विश्वनाथ चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सदलगा पोलिस स्थानकाचे हवालदार शिवकुमार बिरादार यांच्यासह सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
0 Comments