खानापूर / प्रतिनिधी 

लक्केबैल (ता.खानापूर) येथील प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघाच्या अध्यक्षपदी माजी तालुका पंचायत सदस्य व सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक वासुदेव नांदुरकर (बलोगा) यांची यांची वर्णी लागली असून  उपाध्यक्षपदी बसवानी सिद्राम सनदी  (बलोगा) यांची निवड झाली आहे.

बुधवार दि. ९ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेली ही निवडणुक अतिशय चुरशीची झाली. या संस्थेच्या एकूण १२ संचालकांमध्ये परस्परांविरोधात समान संख्या बळ असलेले दोन गट निर्माण झाले. यामध्ये माजी आमदार अरविंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली वासुदेव तुकाराम नांदुरकर यांनी अध्यक्ष पदासाठी तर बसवानी सिद्राम सनदी यांनी उपाध्यक्ष पदासाठी अर्ज भरला होता. तर त्यांच्या विरोधात अध्यक्ष पदासाठी  बसवराज देमनगौडा पाटील (लक्केबैल) व उपाध्यक्ष पदासाठी  पिराजी वसंत चव्हाण (लोकोळी) यांनी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे निवडणुकीत रंगत निर्माण झाली होती. गेल्या दोन-तीन दिवसांपासून अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीची सर्वत्र चर्चा सुरू होती. त्यामुळे अध्यक्षपदी कोणाची निवड होणार याकडे सर्व सभासदांचे लक्ष लागले होते. दोन्ही गटातील उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत झाली. पण अध्यक्ष - उपाध्यक्ष पदासाठी दोन्ही गटातील उमेदवारांना   प्रत्येकी सहा अशी समान मते पडल्याने निवडणूक अधिकाऱ्यांना लॉटरीद्वारे अध्यक्ष - उपाध्यक्षांची निवड घोषित करावी लागली.

निवडणूक अधिकारी म्हणून शंकर करबसनावर यांनी काम पाहिले. अध्यक्ष - उपाध्यक्षांचे कृषी पतीन सहकारी संघाचे व्यवस्थापक प्रकाश पाटील यांनी संस्थेच्या वतीने अभिनंदन केले. यावेळी वासुदेव नांदुरकर यांचे समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते.