- एकाचवेळी ११ हजार ठिकाणी होणार उदघाटन
- महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली माहिती
बेंगळूर दि. १० ऑगस्ट २०२३ :
राज्य सरकारच्या बहुप्रतिक्षित प्रकल्पांपैकी एक 'गृहलक्ष्मी' या योजनेचा संपूर्ण राज्यासह बेळगावात येत्या दि. २७ ऑगस्ट रोजी शुभारंभ होणार आहे. या योजनेच्या उदघाटन सोहळ्याला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, प्रियांका गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना निमंत्रित केले जाणार असल्याचे महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. बेंगळूर येथे उपमुख्यमंत्री तथा कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या उपस्थितीत झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर पुढे म्हणाल्या, राज्यातील ११ हजार ठिकाणी एकाचवेळी 'गृहलक्ष्मी' या योजनेचे लोकार्पण करण्यात येणार असून सर्व ग्रामपंचायती, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये उद्घाटन सोहळा होणार आहे. सोहळ्याच्या नियोजनासाठी पंचायतीने नोडल अधिकारी नेमले आहेत. मंत्र्यांनी पक्षविरहित कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे आवाहन केले असून सर्वांनी सहभागी व्हावे; बेळगावमध्येच गृहलक्ष्मी योजना सुरू व्हावी, हे माझे स्वप्न आहे. याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे. माझ्या विनंतीला मान देऊन आमचे नेते बेळगावात मोठा कार्यक्रम आयोजित करण्यास मदत करत आहेत. ही ऐतिहासिक घटना असेल असेही मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले.
0 Comments