बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव शहर आणि बेळगाव ग्रामीण असे दोन वेगवेगळे तालुके करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर लवकरच अंमलबजावणी केली जाणार असल्याचे बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. मंगळवार दि. १५ ऑगस्ट रोजी बेळगाव जिल्हा क्रीडांगण येथे झालेल्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.  

बेळगाव तालुक्याचे विभाजन होणारच आहे. मात्र कोणत्या पद्धतीने विभाजन करायचे  याबद्दल अधिकारी निर्णय घेतील असेही सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाबाबत जिल्ह्यातील आमदारांशी  पहिल्या टप्प्यातील  चर्चा झाली आहे. चिक्कोडी आणि गोकाक असे दोन नवीन जिल्हे करा अशी मागणी करण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून नवीन तीन जिल्हे निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. तेही लवकरच करू असेही पालकमंत्री जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.