• कपिलेश्वर मंदिरानजीकच्या तलावात आढळले होते मृतदेह 
  • आई - पत्नीच्या वियोगातून आत्महत्या केल्याचे उघड 
  • दोन्ही मृत वेगवेगळ्या कुटुंबातील 

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव शहरातील कपिलेश्वर मंदिरानजीकच्या तलावात आज सकाळी आढळून आलेल्या त्या दोन्ही मृतदेहांची ओळख पटली आहे. पोलिस तपासात दोघांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. दोघांच्या आत्महत्येची कारणे वेगवेगळी असली तरी सर्वांच्या मनाला चटका लावणारी आहेत. चित्रलेखा सपार आणि विजय पवार अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. 

याबाबत प्राप्त माहिती अशी की, चित्रलेखा सपार हिच्या आईचे नुकतेच निधन झाले. आईच्या निधनानंतर मानसिकदृष्ट्या खचलेल्या चित्रलेखाने आईच्या आठवणीने नैराश्येतून तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.  

तर कांगले गल्ली बेळगाव येथील रहिवासी विजय पवार यांनी पत्नी वियोगातून तलावात उडी घेऊन जीवन संपविले. मंगळवारी रात्री घरातून बाहेर पडलेल्या विजय यांचा मृतदेह आज सकाळी कपिलेश्वर तलावात आढळून आला. त्यांच्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वी हृदयविकाराने निधन झाले होते. पत्नीच्या निधनानंतर ते मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते. मृत विजय पवार यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान आज सकाळी योगायोगाने दोन्ही मृतदेह एकाचवेळी एकाच तलावात सापडले होते. 

एकंदरीत आई आणि पत्नीच्या नात्यापासून दुरावलेल्या दोन निष्पाप जीवांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबियातून हळहळ व्यक्त होत आहे.