बेळगाव / प्रतिनिधी

धारवाडमध्ये आज सकाळी लोकायुक्तांनी धाड घातली असून बेळगाव महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांच्या घरावर छापा टाकून कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. बेळगाव महापालिकेत सहाय्यक आयुक्त असलेले संतोष अनिशेट्टर यांच्या घरावर लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या पथकाने धाड घातली आणि सप्तपूर येथील मिशिगन लेआउट येथील घराची झडती घेतली जात आहे. महत्त्वाची कागदपत्रे मिळाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. धारवाड मध्ये कोट्यवधींचे घर असलेले संतोष अनिशेट्टर हे सध्या बेळगाव महामंडळात कार्यरत आहेत. अनिशेट्टरांच्या घराची चौकशी सुरू केलेल्या लोकायुक्तांनी अनेक महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली असून अधिक चौकशी सुरू केली आहे.