- अथणी तालुक्यातील घटना
अथणी / वार्ताहर
बेळगाव जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू आहे. पावसामुळे शेती बागायतींचे नुकसान झाले असून घरांची पडझड होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच सततच्या पावसामुळे घराची भिंत अंगावर कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. बेळगाव जिल्ह्याच्या अथणी तालुक्यात अथणी पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना उघडकीस आली आहे.काशिनाथ आप्पासाब सुतार (वय २३,रा. तासे गल्ली, अथणी) असे मृत तरुणाचे नाव आहे. तरुणाच्या मृत्यूमुळे सुतार कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
सततच्या पावसामुळे घराची भिंत कोसळून अंगावर पडल्याने तो जागीच मृत्युमुखी पडला. घटनेची माहिती मिळताच अथणीचे पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांच्यावतीने नेते चिदानंद सवदी यांनी मृत तरुणाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या घटनेची नोंद अथणी पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 Comments