- टिळकवाडी पोलिसांची कारवाई
बेळगाव / प्रतिनिधी
हिंदवाडी येथील महावीर उद्यानाजवळ एका मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात टिळकवाडी पोलिसांना यश आले आहे.
मुलीच्या पालकांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलीस निरीक्षक दयानंद शेगुणशी यांच्या मार्गदर्शनाखाली टिळकवाडी पोलिसांनी सर्व माहिती घेऊन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले. गजानन पाटील (वय ३५, रा. मारुती नगर, बेळगाव) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी टिळकवाडी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
- असा झाला होता अपहरणाचा प्रयत्न -
मंगळवारी सायंकाळच्या सुमारास गजानन पाटील याने बेळगाव शहरातील हिंदवाडी पोस्ट ऑफिसनजीक महावीर गार्डन येथे चॉकलेटचे आमिष दाखवून इयत्ता ५ वी तील शिकवणीसाठी निघालेल्या एका नऊ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न केला होता. यावेळी त्या मुलीने स्वतःची सुटका करून घेण्यासाठी धडपड करत आरडाओरडा केला. तिथून ये- जा करणाऱ्या नागरिकांनी हा प्रकार पहिला असता संशय आल्याने मुलीची सुटका करण्यासाठी नागरिकांनी गजानन पाटील याचा पाठलाग सुरू केला. पकडल्या जाण्याच्या भीतीमुळे गजानन मुलीला तिथेच सोडून घटनास्थळावरून पळून गेला होता.
या घटनेनंतर शहरात एकच खळबळ माजली होती. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी टिळकवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता अपहरणकर्ता मुलीला उचलून पळून जातानाचे दृष्य सीसीटीव्हीत कैद झाले होते.
0 Comments