•  सोने - चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

खानापूर / प्रतिनिधी 

घरात कोणीच नसल्याची संधी साधून भरदिवसा केलेल्या घरफोडीत चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली. मणतुर्गा (ता. खानापूर) येथे बुधवारी दुपारच्या सुमारास असोगा मार्गावरील अल्बेट मोनू सोज यांच्या घरी हा चोरीचा प्रकार घडला.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, अल्बेट सोज आपल्या घराचा दरवाजा बंद करून शेतवडीकडे कामासाठी गेले होते. यावेळी घरात कोणीच नसल्याचे पाहून चोरट्यांनी पाठीमागच्या दरवाजाची कडी तोडून आत  प्रवेश केला. यानंतर चोरट्यांनी घरातील तिजोरी फोडून अन्य कपाटांची नासधूस केली. यावेळी तिजोरीतील ८ तोळे सोन्याचे दागिने, १३ तोळे चांदी सहा हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. सायंकाळी ५ वा. सुमारास सोज कुटुंबीय शेतातून घरी आले असता चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. सोज यांनी तातडीने खानापूर पोलीस स्थानकात चोरीची तक्रार दाखल केली. माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून पाहणी केली.