सुळगा (हिं.) / वार्ताहर
उचगाव (ता. बेळगाव) येथील ग्रामपंचायत अध्यक्ष - उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत चक्क तेरसे दाम्पत्याच्या हाती गावचा कारभार सोपविण्यात आला आहे. यात अध्यक्षपदी पत्नी मथुरा तेरसे तर उपाध्यक्षपदी पती बाळकृष्ण तेरसे यांची बिनविरोध निवड झालीआहे. पुढील अडीच वर्षांसाठी तेरसे दाम्पत्य उचगाव ग्रामपंचायतीचे अध्यक्ष - उपाध्यक्ष पद भूषविणार आहे.
जवळपास ८००० लोकसंख्या असलेल्या उचगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात उचगावसह, बसुर्ते आणि कोनेवाडी ही गावे येतात. या ग्रामपंचायतीत एकूण २१ सदस्य आहेत. ग्रामपंचायत अध्यक्ष पदासाठी महिला आरक्षण असल्याने मथुरा बाळकृष्ण तेरसे यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. तेरसे दाम्पत्याने पहिल्यांदाच ही निवडणूक लढवली आणि दोघांचीही अध्यक्ष - उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. गावातील सामाजिक शैक्षणिक कार्यात गेली अनेक वर्षे बाळकृष्ण तेरसे यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची पोच पावती म्हणून गावकऱ्यांनी ग्रामपंचायत अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाची जबाबदारी या पती-पत्नीवर सोपविली आहे.
0 Comments