खानापूर / प्रतिनिधी
गणेबैल टोल नाक्यावर आजपासून टोल वसुली करण्यात येणार होती. त्या संदर्भात कालच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी जमिनी केलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला मिळाला पाहिजे व संपूर्ण रस्ता व सर्विस रस्ता पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली करण्यात येऊ नये अन्यथा टोल नाका बंद पडण्यात येईल असा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने आज सकाळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी व त्यांचे सहकारी भाजप तालुका जनरल सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी व परिसरातील शेतकरी आज गणेबैल नाक्यावर उपस्थित होते.
ज्यावेळी अधिकारी टोल वसुलीची सुरुवात करण्यासाठी आले असता, तेथे उपस्थित असलेले प्रमोद कोचेरी त्या भागातील नागरिक व शेतकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घातला जोपर्यंत जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या उर्वरित पैशांचे ठोस आश्वासन लेखी स्वरूपात मिळत नाही. तसेच टोल वसुली करायची असेल तर ३० किलोमीटरचा रस्ता असणे आवश्यक आहे. परंतु या ठिकाणी फक्त १६ किलोमीटरच्या रस्त्यासाठी टोल आकारणी करण्यात येणार आहे. हे चुकीचे आहे त्यासाठी संपूर्ण काम झाल्यानंतरच टोल वसुली करण्यात यावी अशी जोरदार मागणी केली. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून लवकरात लवकर सर्व शेतकरी व नागरिकांचे बैठक बोलावून लेखी ठोस आश्वासन देण्यात येईल अशी ग्वाही दिली. व त्यानंतरच टोल नाक्यावरील वसुलीला सुरुवात करण्यात येईल असे सांगितले. यावेळी शेतकरी व नागरिकांच्या वतीने भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी व माजी आमदार अरविंद पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
यावेळी भाजपा युवा नेते पंडित ओगले तसेच गणेबैल व परिसरातील नागरिक, रस्त्याचे जमीन गेलेले शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments